श्री.सिध्देश्वर कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर

संस्थेविषयी माहिती

सोलापूर बाजार समितीची स्थापना

मुंबईचा शेती उत्पन्न बाजाराबाबतचा अधिनियम १९३९ व त्याखालील नियम १९४७ नुसार त्यावेळचे मुंबई सरकारने नंबर एपीएम-२७ दिनांक १२/८/१९५९ च्या नोटीफिकेशन अन्वये उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यास मार्केट क्षेत्र लागू केले. त्यानुसार सोलापूर बाजार समितीची स्थापना दिनांक १२/८/१९५९ रोजी झाली. त्यानंतर त्यावेळचे मुंबई सरकारने पीएमसी /१०६०-३०६९० जी (२) दिनांक ६/१०/१९६० च्या नोटीफिकेशन अन्वये पहिल्या शासन नियुक्त बाजार समितीची नियुक्ती केली. सोलापूर बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाजास अक्षय तृतीया, बसवजयंती, शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक १७/४/१९६१ पासून सुरुवात झाली. सध्या महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) नियम १९६७ नुसार सोलापूर बाजार समितीचे कामकाज चालू आहे.

बाजारक्षेत्र व भौगोलिक माहिती

सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुका या दोन तालुक्याचे आहे. बाजार क्षेत्रात सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यात ४१ व दक्षिण सोलापूर तालुक्यात ९० असे एकूण १३१ गावे आहेत. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे सोलापूर शहराची लोकसंख्या ९५१११८, उत्तर सोलापूर तालुक्याची लोकसंख्या १०५११४ , दक्षिण सोलापूर तालुक्याची लोकसंख्या २६००४६ अशी बाजार क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १३१६२७८ आहे. बाजार क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १९४१/६० चौ. कि.मी. इतके असून त्यात सोलापूर शहराचे १७८/५७ चौ. कि. मी. व उत्तर सोलापूर तालुक्याचे ५६७/७३ चौ.कि.मी.व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९५/३० चौ.कि.मी.इतके आहे. सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८३०३ हेक्टर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९४६३ हेक्टर असे एकूण १८७७६६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर, मका व रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, करडी, इत्यादी पीके घेतली जातात व बागायती क्षेत्रात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे,डाळीब व इतर फळे व भाजीपाला इत्यादी पीके घेतली जातात.सोलापूरचे सन २०२४-२०२५ चे किमान तापमान १४/० सेल्सिअस व कमाल तापमान ४५/०० सेल्सिअस आहे. सोलापूरचे सरासरी पर्जन्यमान ५४१/०० मि. मि. आहे.

नियंत्रित शेतीमाल

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीने सन १९६१ या वर्षी सुरुवातीस १८ शेतीमालाचे व्यवहार नियंत्रित केले होते. सध्या बाजार समितीचे नियंत्रणाखाली ६९ शेतीमालाचे व्यवहार आहेत.